मुंबई:प्रतिनिधि
दि:३०:मे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर महिला खेळाडूंनी शोषणाचा आरोप केला होता. त्यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी महिनाभरापासून आंदोलन सुरू होतो. साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह इतर खेळाडू या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी फरपटत खेळाडूंना जबरदस्ती आपल्या वाहनात बसवलं. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी ट्विट करत सचिन तेंडुलकर आणि सरकारला सवाल विचारला आहे.
भारतीय महिला खेळाडूंवर झालेल्या अत्याचाराबाबत निखिल वागळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक खेळाडू असून सचिन तेंडुलकरने कुस्तीवीर मुलींच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून निखिल वागळे यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. लाज वाटते तू भारतरत्न असल्याची, असा घणाघात निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सचिन तेंडुलकरवर केला आहे. त्याचबरोबर निखिल वागळे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रिय सचिन, कुस्तीगीर मुलींची वेदना तुला अजूनही समजली नसेल तर तुझ्यातला माणूस मेला आहे! लाज वाटते तू भारतरत्न असल्याची..
आज संध्याकाळी ६ वाजता कुस्तीगीर मुली सरकारच्या निषेधार्थ आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. काय म्हणावं या कोडग्या सरकारला?
नीरज चोप्रा,अभिनव बिंद्रासारखे महिला कुस्तीगिरांच्या बाजूने उभे राहिलेले एखाददोन अपवाद सोडता बहुसंख्य सेलेब्रिटी खेळाडू इतके थंड रक्ताचे कसे? विनयभंगासारख्या आरोपांचं गांभीर्य त्यांना कळत नाही? आपल्या स्वतःच्या बहिणीवर अत्याचार झाला तरी असे डरपोकपणे वागाल काय?
दरम्यान, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळातून प्रत्येक भारतीय छाती अभिमानाने फुलवली आहे. पोलिसांकडून या खेळाडूंवर कारवाई झाल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक प्रतिक्रिया देत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.