नौवहन क्षेत्राने प्रगतीसोबत सागरी पर्यावरणाशी समतोल साधावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 18 : जागतिक व्यापार वाढत असताना नौवहन क्षेत्र प्रगती करीत आहे. ही प्रगती होत असताना  सागरी पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

          

 राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 11  व्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषद (इन्मार्को 2022) व प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई येथे नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतीय नौवहन महासंचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनीअर्स (इंडिया) या संस्थांनी केले आहे.

           

ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन ही जागतिक समस्या असून या उत्सर्जनाचे  प्रमाण कालबद्ध पद्धतीने कमी व्हावे या दृष्टीने नौवहन क्षेत्राने विचारविनिमय सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी नौवहन संचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्सचे अभिनंदन केले.

            नौवहन क्षेत्राच्या माध्यमातून होणारे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन 40 टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या दृष्टीने सर्व संबंधित क्षेत्रांमध्ये सहकार्य अपेक्षित आहे असे नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सागरी पर्यावरण विभागाचे संचालक आर्सेनिओ डॉमिन्गेझ यांचे बीजभाषण झाले.

            दर चार वर्षांनी होणाऱ्या या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्स (इंडिया) मुंबई शाखेचे अध्यक्ष अरुण कुमार गुप्ता, इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्सचे अध्यक्ष विजेंद्र कुमार जैन, परिषदेचे अध्यक्ष राजीव नय्यर व निमंत्रक डेव्हिड बिरवाडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

            या त्रिदिवसीय परिषदेचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी हरित सागरी विश्व’ हा असून नौवहन उद्योगाशी निगडित विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था व तज्ज्ञ  या परिषदेत सहभागी होत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×