तासगांव:प्रतिनिधी
दि:०७:Jan: टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पास नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली. यासाठी आमदार सुमन पाटील व आमदार अनिल बाबर यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. आम्ही सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. आम्ही केलेल्या प्रयत्नाचे आमच्याकडे पुरावे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पत्रकार परिषदेत आमदार सुमन पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला होता. मात्र आता काहीजण आम्हीच ‘टेंभू’चे शिल्पकार असल्याचे सांगत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता केली.
तासगाव येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले, टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी. वंचित गावांना हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी २ ऑक्टोबर रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार सुमन पाटील यांच्यासोबत शेकडो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही उपोषण केले. त्यावेळी विरोधकांनी आमच्या उपोषणाची चेष्टा केली.
मात्र उपोषणाच्या नुसत्या इशाऱ्यानंतर वंचित गावांसाठी ८ टीएमसी पाण्याला अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यात टेंभूच्या विस्तारित प्रकल्पास सुप्रमा देण्याचे आश्वासन दिले होते. जर महिनाभरात सुप्रमा मिळाली नाही तर मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आम्ही दिला होता. मात्र काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी आमदार सुमन पाटील यांची भेट घेऊन मुदत वाढवून घेतली होती. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात वातावरण अस्थिर झाले होते. त्यामुळे मुंबईतील आंदोलन आम्ही थोडे दिवस स्थगित केले होते
शुक्रवारी या योजनेच्या सुप्रमाचा शासन निर्णय अधिकृतरीत्या मिळाला. ही मान्यता मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे आमच्याकडे आहेत. विरोधकांनी नसते श्रेय घेण्याअगोदर पुरावे द्यावेत. लोकांमध्ये विरोधकांची प्रतिमा ढासळलेली आहे. येत्या काळात लोकच त्यांना प्रत्युत्तर देतील, असाही टोला रोहित पाटील यांनी खासदारांना लगावला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.