उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा .

शिरोळ :राम आवळे 

दि.२५ :चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि गणेश बेकरी नांदणीचे चेअरमन, बेकरी उद्योगातील प्रतिष्ठित उद्योजक आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नांदणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ३१५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने नांदणी येथील नवीन प्रकल्प आणि परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, चेअरमन आण्णासाहेब चकोते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. चकोते ग्रुपने याआधीही हजारो झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी आण्णासाहेब चकोते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गणेश बेकरीचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचावा आणि उद्योगसमूहाने असाच प्रगतीपथावर राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. सन्मती बौध्दिक अक्षम मुलांची शाळा, इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्याचा निर्णय चकोते ग्रुपतर्फे घेण्यात आला.

ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दिल्लीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी सलग आठव्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल आण्णासाहेब चकोते यांचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट विभागाचे कॉर्पोरेट हेड अनिल मोगलाडे यांनी केले. तसेच कंपनीत नव्याने रुजू झालेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ अभय कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, योगेश अंधारे आणि साहील इनामदार यांचे स्वागत चेअरमन आण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना आण्णासाहेब चकोते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक जबाबदारी पार पाडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ग्राहकांना दर्जेदार आणि परवडणारी उत्पादने देणे ही काळाची गरज असल्याने गणेश बेकरी त्यादृष्टीने काम करत आहे. या कार्यक्रमाला नांदणी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, वितरक, व्यापारी आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
08:36