डिके बंधूंनी मरणोत्तर कार्याची प्रबोधन सभा घेऊन रचला नवा पायंडा!

गावकरी आणि मुंबईकर वर्गात परिवर्तनाच्या निर्णयाची जोरदार चर्चा

 

कडवई:नियाझ खान 

दिनांक १२ मार्च

चिपळूण तालुक्यातील कुशिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि सत्यशोधक प्रवर्तक मा. विलास डिके व मा. विकास डिके यांनी आपल्या वडिलांच्या मरणोत्तर कर्मकांडांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने अंत्यसंस्कार व प्रबोधन सभा आयोजित करून एक नवा पायंडा रचला.

मा. भागोजी बुधाजी डिके यांचे दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणतेही पारंपरिक कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारात डिके बंधूंनी आपल्या आईचे सौभाग्य अलंकार उतरवले नाहीत तसेच स्वतः डोक्यावरील केसही काढले नाहीत. यानंतर कोणतेही सातवे, बारावे कर्मकांड न करता त्यांनी अनिष्ट परंपरांना पूर्णविराम देत परिवर्तनाचा नवा मार्ग तयार केला.

दि. ९ मार्च २०२५ रोजी निसर्गवासी मा. भागोजी डिके यांचे मरणोत्तर सत्यशोधक कार्य पार पडले. या वेळी कोणत्याही कर्मकांडाऐवजी त्यांच्या स्मरणार्थ पाच झाडे लावण्यात आली. तसेच एक शोकसभा आयोजित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत सत्यशोधक प्रवर्तक, कोकणचे गाडगेबाबा मा. मारुतीकाका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पार पडले.

या शोकसभेला अनेक समाजसेवक, विचारवंत आणि सत्यशोधक चळवळीतील मान्यवर उपस्थित होते. यात प्रमुख उपस्थिती कोकणचे गाडगेबाबा मा. मारुतीकाका जोयशी,सामाजिक कार्यकर्ते मा. तानू आंबेकर,MSCB ऑफिसर मा. अशोक काजरोळकर,सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक मा. रामचंद्र पालकर,कुशिवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मा. प्रकाश कदम,BMC वरिष्ठ लिपीक मा. प्रकाश मालप,कुणबी शिक्षक विचारमंच अध्यक्ष मा. अनंत शिगवण गुरुजी,रत्नागिरी जिल्हा सत्यशोधक समाज संघाचे सदस्य आणि विविध सत्यशोधक प्रवर्तक उपस्थित होते.

या शोकसभेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते मा. तानू आंबेकर यांनी सांगितले की, “गावात परिवर्तन करणे सोपे नाही, कारण लोक कर्मकांडालाच धर्म मानतात. मात्र, डिके बंधूंच्या आईने कोणतेही अलंकार न उतरवता आणि कुंकू न पुसता कृतीतून परिवर्तन करून दाखवले. हे परिवर्तन फक्त विचारांचे नाही, तर संपूर्ण समाजमनात बदल घडवण्याचा प्रयत्न आहे. कर्मकांडातून मुक्त समाज निर्माण करून भयमुक्त समाज घडवण्याची ही सुरुवात आहे.”या शोकसभेचे सूत्रसंचालन मा. मिलिंद कडवईकर सरांनी केले.

डिके कुटुंबाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण कुशिवडे गाव तसेच मुंबईकर व कोकणातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सत्यशोधक विचारांना नवसंजीवनी मिळत असल्याचे स्पष्ट होत असून, अनेकांनी या कृतीतून प्रेरणा घेत कर्मकांडमुक्त समाजाच्या दिशेने पाऊल टाकण्याचे संकेत दिले आहेत.

हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी एक नवा विचारप्रवाह घेऊन आला आहे. डिके बंधूंच्या या धाडसी निर्णयाने सत्यशोधक चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून, कोकणातील हा बदल भावी पिढीला नवा दिशा देईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
15:03