शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सांगली:प्रतिनिधी

दि.२६ : शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज संबधित यंत्रणेला आज दिल्या.

जिल्हयातील महानगरपालिका व नगरपालिका/नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये आयुष्मान कार्ड काढण्याच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायतींच्या मुख्यधिकारी व महानगरपालिकाचे आरोग्याधिकारी यांच्याकडून व्ही.सी व्दारे आढावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, आयुष्यमान कार्ड काढण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दैनंदिन कामकाजाचे नियोजन योग्यरीत्या करणे गरजेचे आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आपले अधिनस्त असणारे कर्मचारी यांच्या मार्फत नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या यादी नुसार गृहभेटी देऊन लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड काढण्यात यावे. गृहभेटीच्या वेळी प्रत्येक घराच्या दर्शनीभागावर खुण (मार्क) करण्यात यावे. गृहभेटी देऊन लाभार्थीना कार्ड काढण्यास प्रवृत्त करावे.

 स्वस्तधान्य दुकानामध्ये कार्ड काढण्यासाठी दुकानदारांची मदत घेण्यात यावी. तसेच सीडींग संगणकीकरण झालेल्या लाभार्थीची यादी प्राप्त करुन घेणे, आयुष्मान भारत ई कार्ड काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व CSC ची मदत घेण्यात यावी. असे सांगून श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, नगरपालिका/नगरपंचायत कार्यक्षेत्रात स्वस्त धान्य दुकानामध्ये शिधा वाटप करतेवळी लाभार्थीची आयुष्मान कार्ड काढण्याचे काम करणेत यावे, जेणे करुन आपल्या नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील सर्व लाभार्थीचे ई कार्ड वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल. नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील पदाधिकारी / नगरसेवकांमार्फत लाभार्थी यादीनुसार विशेष मोहिम घेऊन आयुष्मान कार्ड काढण्यात यावे. सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्वस्त धान्य दुकान, आरोग्य मित्र, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्या मार्फत आयुष्मान कार्ड काढण्याचे काम जोमाने सुरु करावे तसेच कॉलेज मधील NSS चे विदयार्थी / तरुण मंडळे / सामाजिक संस्था इ. मदत घ्यावी.

प्रभाग व वॉर्ड निहाय कर्मचारी यांच्या मार्फत लोकांच्या सोयीनुसार सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशीरा पर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात यावे. ३१ डिसेंबरपूर्वी जनआरोग्य योजनेतील सर्व लाभार्थीचे आयुष्यमान कार्ड 100 टक्के पूर्ण करावे. लाभार्थीला स्वतःलाही त्यांच्या मोबाईलवरून Ayushman App. व्दारे हे कार्ड काढता येते याबाबत माहिती द्यावी अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबधित यंत्रणेला दिल्या.

आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका व नगरपालिका यांच्या माध्यमातून आपण ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेचा फायदा घ्यावा आणि आयुष्मान कार्ड सर्वांनी काढून घ्यावे तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला स्वतः सुद्धा आपल्या मोबाईल वरती हे आयुष्मान कार्ड काढता येते. तरी सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व या मोहिमेमध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×