चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील उर्दू शिक्षण परिषद महाराष्ट्र हायस्कूलच्या भव्य हॉलमध्ये तालुका समन्वयक अशफाक पाते यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली. वांगडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर हम्द आणि नआत पठणाचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात सादर केले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित सादरीकरण वांगडे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सबिहा चौगुले यांनी उत्कृष्टपणे सादर केले. विद्यार्थ्यांना होणारे नेत्रविकार व नेत्रदानाचे महत्त्व याबाबत डॉ. जानवलकर यांनी उदाहरणांसह सखोल माहिती दिली.
विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा कशी करावी याबाबत हेड कांस्टेबल रमा करमरकर यांनी मार्गदर्शन केले. मुलींना आत्मरक्षेसाठी प्रेरित करण्याचे महत्त्व त्यांनी विषद केले, तसेच गरज पडल्यास पोलीस ठाणे किंवा हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्यास सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्ये, अधिकार, आणि तिच्या पुनर्गठनाविषयी विजय माने यांनी ज्ञान दिले. सखी सावित्री समिती गठीत करून मुलींच्या समस्या सोडविण्याचे मार्गदर्शन फातिमा कुपे यांनी केले.
इंग्रजी विषय शिकविण्याच्या सोप्या पद्धती व विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी शैलेश कुळे यांनी उदाहरणासह मार्गदर्शन केले. शाळेत तक्रार पेटी का असावी व ती कशा प्रकारे व्यवस्थापित करावी याबाबत अजमिना पांगारकर यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशफाक पाते आणि शौकत कारविणकर यांनी मेहनत घेतली, तर तालुक्यातील सर्व उर्दू शाळांचे शिक्षक उपस्थित राहिल्याबद्दल जियाऊल्ला खान यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.