ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर अनोखी पर्यावरणस्नेही बाग
ठाणे :अजमल खान
दि. २४ ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृती आराखड्यातून प्रेरणा घेऊन ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने छतावर एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही टेरेस गार्डन साकारले आहे.
लाकूड, प्लॅस्टिक व कपड्यांसारख्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून या बागेची रचना करण्यात आली असून, कार्यालय परिसरातील उष्णता कमी करण्याबरोबरच नैसर्गिक डास प्रतिबंधक वनस्पतींचाही समावेश करण्यात आला आहे. या बागेत ट्रेसीना, एलिफंट इयर, स्नेक प्लांट, हेनीकेनी, जास्वंद, लेमन ग्रास आदी ४५ हून अधिक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
पर्यावरणतज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांनी सांगितले की, “प्रत्येक वस्तू फेकण्याऐवजी दुसरे आयुष्य देता येते, हे या बागेतून दाखवण्याचा प्रयत्न आहे. इथली प्रत्येक रोपे आपल्याला संयम व जबाबदारी शिकवतात.”
या उपक्रमाचा उद्देश केवळ हिरवळ वाढवणे नसून कचऱ्याबद्दल जनजागृती करून समाजात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था व शासकीय कार्यालये येथेही असे मॉडेल सहज राबवता येईल, असे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी सांगितले.“ही बाग जनचळवळ बनावी, यासाठी शासन व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे कट्टी यांनी आवाहन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.