वरदान क्रीडा मंडळ, कडवईत नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न
दांडिया, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची स्पर्धांना प्रतिसाद – कुमारी श्रुती कापडीचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सन्माननीय सहभाग
कडवई : दीपक तुळसणकर
दि.५ : वरदान क्रीडा मंडळ, कडवई यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांसह उत्साहात संपन्न झाला. उत्सव काळात मंडळाच्या वतीने दांडिया, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नागरिक आणि लहान मुलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्यांचा सन्मान करून त्यांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आले. वरदान क्रीडा मंडळ दरवर्षी अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करत असते. या उपक्रमांमुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच स्पर्धेची आवड आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, वरदान क्रीडा मंडळाचे सभासद अमोल शेठ कापडी यांची कन्या कुमारी श्रुती कापडी हिने ‘World Food India’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र शासन कृषी आयुक्तालय, पुणे यांच्यावतीने निवडलेल्या दहा प्रकल्पांपैकी RK Food Processing या श्रुतीच्या प्रकल्पाची निवड झाली होती.
या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात तब्बल ३० देशांमधून प्रतिनिधी सहभागी झाले होते, तर १५०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. विविध देशांतील मंत्र्यांनी श्रुतीच्या उत्पादनांची चव घेत तिचे कौतुक केले. तसेच निर्यात क्षेत्रात आवश्यक असणारे शासकीय सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने दिपश्री खातू यांनी श्रुती कापडी हिचा उत्स्फूर्त सत्कार केला. तिच्या आई अमृता कापडी आणि वडील अमोल कापडी यांचा देखील सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.