छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजेत शिवसंस्कृतीचा दिमाखदार जागर

 सांगली: अय्यान पटेल

दि.१८: शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाफ अनुभवायला मिळाला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात शिवचरित्र केवळ शब्दांत नव्हे, तर पोवाडे, नृत्य, मर्दानी खेळ आणि ढोल-ताशांच्या निनादातून जिवंत झाले.

            उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी शिवजयंतीचा सांस्कृतिक आशय अधोरेखित करताना सांगितले की, शिवरायांचे स्मरण म्हणजे आपल्या परंपरेचा आणि स्वाभिमानाचा उत्सव होय. त्यांच्या कार्यातून घडलेली लोकाभिमुख राज्यव्यवस्था, स्त्री-सन्मान, शौर्य आणि न्यायप्रियता हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी शिवभक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, नगरप्रशासन शाखेचे सहआयुक्त दत्तात्रय लांघी, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार लिना खरात, माजी मंत्री आण्णा डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे यांनी शिवजयंती हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर असल्याचे सांगितले. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून घडलेली लोककल्याणकारी मूल्ये आजच्या सामाजिक जीवनालाही प्रेरणा देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी, शाहीर अनंतकुमार साळुंखे आणि शाहीर रामचंद्र जाधव यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी सभागृह दुमदुमले. ढोलकीच्या ठेक्यावर आणि रणशिंगाच्या नादात शिवचरित्रातील पराक्रम उलगडला. सुमित डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यप्रकार, मर्दानी खेळ आणि युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी मराठी लोकसंस्कृतीचा दिमाख ठळकपणे अधोरेखित केला.

            याप्रसंगी ‘श्रीमंतयोगी’ हे शिवचरित्रावर आधारित महानाट्य 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सादर होणार असल्याची माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी उपस्थित राहून संस्कृतीच्या या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.