खेड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अंधश्रद्धाविरोधी प्रबोधन

खेड: प्रतिनिधी

दि.९: खेड येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन  येथे खेड तालुका बौद्ध सेवा संघ, महिला समिती तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी,सचिन गोवळकर,पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव ,खेड तालुका बौद्ध सेवा संघ, महिला समितीच्या अध्यक्षा स्वाती संतोष जाधव,अनिस खेड शाखा सचिव अपूर्वा पवार,गायक तेजस्वी कांबळे , महिला समुपदेशन केंद्राच्या तेजश्री जाधव, विशाखा चव्हाण यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे सचिन गोवळकर यांनी “महिला आणि महिलांमधील अंधश्रद्धा” या प्रबोधनपर भाषणात त्यांनी समाजामध्ये आजही विविध प्रकारच्या अंधश्रद्धा प्रचलित असल्याचे सांगितले. विशेषतः महिलांच्या आयुष्यात रूढी, परंपरा आणि चुकीच्या समजुतींच्या माध्यमातून अंधश्रद्धा अधिक प्रमाणात पसरलेल्या दिसून येतात. या अंधश्रद्धांमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर, आरोग्यावर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

       महिलांनी कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी तिच्यामागील सत्य आणि वैज्ञानिक कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महिलांनीच घरातून विवेक, समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करावा, असेही त्यांनी सांगितले.यावेळी  उपस्थिताना  मार्गदर्शन स्वाती जाधव म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून स्वाभिमानाचा मार्ग दाखवला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार बहाल करून समानतेची भक्कम पायाभरणी केली. या महान विचारांच्या बळावर सर्व महिलांनी एकजूट होऊन अन्यायाविरुद्ध उभे राहत स्वतःची सर्वांगीण प्रगती घडवून आणली पाहिजे.

       यावेळी खेड मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना गौरविण्यात आले.यावेळी  कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रबोधनपर आणि विचारप्रवर्तक अशा या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जागरूकता निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन खेड तालुका बौद्ध सेवा संघ, महिला समितीच्या  सरचिटणीस व अनिस खेड शाखा सचिव अपूर्वा पवार यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.