ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
राजिवली (ता. संगमेश्वर): सचिन पाटोळे
दि.८: संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या ग्रामपंचायतीस कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडे तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते पंधरा दिवसांतून केवळ एकदाच ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज प्रभावीपणे होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक असलेली जन्म–मृत्यू नोंद, विविध दाखले, कर आकारणी, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच शासनाच्या विविध योजनांशी संबंधित अर्ज व तक्रारी यांसाठी नागरिक ठराविक वाराला ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहतात. मात्र अनेक वेळा ग्रामसेवक अनुपस्थित असल्याने नागरिकांचे काम प्रलंबित राहते व त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 तसेच शासनाच्या प्रशासकीय नियमांनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीस नियमित उपलब्ध ग्रामसेवक असणे आवश्यक आहे. तथापि, राजिवली ग्रुप ग्रामपंचायत या मूलभूत प्रशासकीय सेवेपासून वंचित असल्याने ग्रामविकासाच्या कामांवर विपरीत परिणाम होत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन ग्रामस्थ लवकरच ग्राम विकास अधिकारी, पंचायत समिती देवरुख यांच्याकडे निवेदन सादर करणार असून, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून राजिवली ग्रुप ग्रामपंचायतसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी ग्रामसेवकाची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडावी लागेल, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.