संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांची कथित फसवणूक पत्रावळी-द्रोण मशीन व्यवहारावर गंभीर आरोप
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.९: संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील एका व्यक्तीविरोधात संगमेश्वर वासीयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. सदर व्यक्ती पूर्वी तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जात होती. मात्र अलीकडील काळात आर्थिक अडचणींमुळे त्याने फसवणुकीचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप पीडित नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती पत्रावळी व द्रोण तयार करण्यासाठी लागणारी आधुनिक मशीन देतो, तसेच तयार माल खरेदी करतो आणि कच्चा मालही पुरवतो, असे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात नवीन मशीनऐवजी जुनी मशीन रंगरंगोटी करून दिली जाते आणि नवीन मशीनसाठीचे पैसे घेतले जातात, असा आरोप आहे.
तसेच कच्चा माल न देता काम सुरू करण्यास भाग पाडले जाते. या फसवणुकीमुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही नागरिकांनी कंटाळून सदर मशीन परत घेऊन पैसे परत देण्याची मागणी केली असता, “दुसरे ग्राहक शोधतो” असे सांगून मशीनही परत घेतली जात नाही व पैसेही दिले जात नाहीत, अशी तक्रार आहे.याशिवाय या व्यक्तीने स्थानिक बँकांचीही कथित फसवणूक केल्याचे आरोप समोर येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटोळे यांनी संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी अशा व्यवहारांबाबत सावध राहावे, तसेच फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पोलिस व संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.