पोलीसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा:-जिल्हाधिकारी मनुज जिंदल
नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक
रत्नागिरी: नियाझ खान
दि. २७ : पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात सतर्क रहावे. त्याबाबत मिळणाऱ्या गुप्त सूचना, इंटेलिजेन्सवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे आदी उपस्थित होते.

श्री. महामुनी यांनी सविस्तर आढावा दिला. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, कोस्टगार्डने बोटींची तपासणी करावी. साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले होते. त्या धर्तीवर प्रत्येक विभागाने सतर्क राहून तपासणी करावी. या तपासणीचा तसेच आपण केलेल्या कार्याचा अहवाल पाठवून द्यावा. मच्छीमार बोटींवर नेपाळी कामगांराच्या अंमली पदार्थांच्या नशेत अपघात घडले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे येणारा स्त्रोत तपासा. त्यासाठी मच्छीमारांची मदत घ्यावी. पोलीसांनी पेट्रोलिंग वाढवून आपले गोपनीय नेटवर्क वाढविले पाहिजे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. शिक्षकांनाही सतर्क करावे. कृषी आणि वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी सतर्क रहावे. अंमली पदार्थ विरोधात जास्तीत जास्त कारवाया झाल्या पाहिजेत, त्यासाठी सर्वांनी अलर्ट मोडवर काम करावे .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.