सायबर फसवणुकीप्रकरणी एक इसम अटकेत

रत्नागिरी सायबर पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी: नियाझ खान 
दि.२८ : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील  सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध बनावट कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल १ कोटी २३ लाख रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्यातील आरोपीने आपण बेंगळुरू पोलिस व नवी दिल्ली येथील सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवत फिर्यादीला त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा  (मुंबई) येथील खात्यामधून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे सांगितले. त्यासाठी डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करत एकूण ₹१,२३,००,०००/- (एक कोटी तेवीस लाख रुपये) इतकी फसवणूक करण्यात आली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बँकांकडून प्राप्त आर्थिक माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न झाला. रत्नागिरी सायबर पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई येथे सापळा रचून दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महाडुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी सायबर पोलीस ठाणे करत असून, नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.कोणीही स्वतःला पोलीस, सी.बी.आय. अधिकारी, बँक किंवा सायबर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून बँक खाते, एटीएम, ओटीपी किंवा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असल्यास अशा कॉलवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!