श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूरच्या संचालकांचा श्री दत्त कारखान्यावर अभ्यास दौरा

शिरोळ: राम आवळे
दि.१२: श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, इंदापूरच्या सर्व संचालक आणि शेती अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प, शेडशाळ येथील बीज बँकेचे काम, माती, पाने व पाणी परीक्षण, सुपर केन नर्सरी आदी संदर्भातली माहिती घेतली.


प्रारंभी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी सर्वच मान्यवरांचे स्वागत केले. कारखान्याच्या वतीने सुरू असलेले एकरी 150 मेट्रिक टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, क्षारपड मुक्तीचे काम आदींची विस्तृत माहिती गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याच्या प्रयोग शाळेमध्ये माती, पाने व पाणी परीक्षण यासंदर्भातली माहिती ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी दिली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच क्षारपड जमीन सुधारण्यासाठी झालेले प्रयत्न आणि त्याची यशोगाथा सांगितली. क्षारपड मुक्तीचा दत्त पॅटर्न समजावून दिला.
कवठेगुलंद व गौरवाड येथे क्षारपड मुक्तीचे झालेले काम पाहून सर्वच संचालक आणि अधिकारी भारावून गेले. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त साखर कारखान्याने केलेले क्षारपड मुक्तीचे काम हे खूपच कौतुकास्पद असून शेतकऱ्यांनी याचा वापर करण्यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. तसेच या ठिकाणी राबविण्यात आलेले सर्वच उपक्रम श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कशा प्रकारे राबवता येतील याचाही निश्चितपणे विचार करण्यात येईल असे सांगितले. शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन सर्वांनी माहिती घेऊन या उपक्रमाचेही कौतुक केले. सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्हाईस चेअरमन कैलासतात्या गावडे, संचालक पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, निलेश टिळेकर, सतीशराव देवकाते, संतोष मासाळ, विठ्ठलराव शिंगाडे, सुचेताताई सकपाळ, सचिनराव सकपाळ, दत्तात्रय राजपुरे, शेती अधिकारी जालिंदर शिंदे, प्रल्हाद लावंड, ऊस विकास अधिकारी बाळासाहेब रुपन्ननवर, सिव्हिलचे मारुती दरेकर, इडीपी मॅनेजर कैलास देवकर, टाईम कीपर म्हेत्रे यांनी अभ्यास दौऱ्यात भाग घेतला.यावेळी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथराव पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक भैय्यासाहेब पाटील, शेखर पाटील, दरगु गावडे यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, इंजिनियर किर्तीवर्धन मरजे यांच्यासह शेती विभागाचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.