सांगली: अय्यान पटेल
दि.२: अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात Tata Technologies यांच्या सहकार्याने अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य वर्धन प्रशिक्षण केंद्र (CIIIT पद्धती) सुरू करण्याची प्रक्रिया वेगात राबविण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक उद्योगांच्या गरजांनुसार तातडीने सर्वेक्षण करून केंद्राची उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. या उपक्रमामुळे सांगलीची इंडस्ट्रियल हब म्हणून ओळख मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र शासनाचे समन्वयक प्रीतम गंजेवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.काकडे म्हणाले की, चंद्रपूर व गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या CIIIT (Center for Invention, Innovation, Incubation and Training) केंद्रांच्या धर्तीवर सांगलीतही अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा टेक्नॉलॉजीजकडून खासगी सहभागातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असून सांगलीत ९ अत्याधुनिक प्रयोगशाळा (लॅब्स) स्थापन केल्या जाणार आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्ये देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
बैठकीत पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या युवकांनाही प्रशिक्षणाची संधी द्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना उद्योग अपेक्षित कार्यसंस्कृतीशी सुसंगत प्रशिक्षण मिळून सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.