कबनूर :हबीब शेखदर्जी
दि.२३: संविधान परिवारतर्फे ईद निमित्त नब्ज या विशेषांकाचे प्रकाशन कबनूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या दर्गाहजवळ उत्साहात पार पडले.रोहित दळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. विभावरी नकाते प्रास्ताविक करताना म्हणाल्या की समाजात सद्भाव, सहिष्णुता आणि बंधुभाव वाढावा या उद्देशाने या विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विशेषांकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. कोमल माने यांनी परिवर्तन गीत सादर केले.यावेळी जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे समन्वयक संजय रेंदाळकर यांनी ईद सणाचा मानवी आणि सामाजिक अर्थ स्पष्ट करताना, विविध धर्मांमध्ये एकात्मतेची भावना जोपासण्याची आणि सद्भाव – सहजीवनाची गरज अधोरेखित केली.
समता संघर्ष समितीचे बजरंग लोणारी म्हणाले की, विशेषांकामध्ये धर्मनिरपेक्षता, सामाजिक ऐक्य, तसेच संविधानिक मूल्यांचा प्रचार करणारे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच समाजातील विविध घटकांमध्ये संवाद आणि सहजीवनाची भावना दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले. नब्ज अंकातील कवितांचे वाचन सौरभ पोवार यांनी केले.स्नेहल माळी यांनी हा विशेषांक समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचवून, बंधुभाव आणि समतेचा संदेश अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप सर्वधर्मीय एकतेच्या संदेशाने झाला.
यावेळी अनिल होगाडे, बबन बन्ने, सुषमा साळुंखे, रिटा राॅड्रीग्युज राजू मुजावर, पापालाल सनदी, नौशाद शेडबाळे, हुसेन मुजावर, ,आरिफ पानारी,अफझल मुजावर, इकबाल देसाई, अजीज मुजावर, मुस्तफा शिकलगार, शरद वास्कर, आदिरा रेंदाळकर, निलेश बनगे, ऋतिक बनसोडे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान परिवाराच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.प्रा अमित कोवे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक वरुटे यांनी आभार मानले.