मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

,महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी:नियाझ खान 

दि. २१  : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनिंना लखपती झालेले पहायचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

 

येथील चंपक मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा जास्त आनंद आज तुमच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून झाला. रक्षाबंधनाचा सण एक दिवसाचा असला तरी, भावा-बहिणींमधील ऋणानुबंध कायमचे असतात. तुमचा हा भाऊ आयुष्यभार बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. ज्यांना अजून लाभ मिळाला नाही, त्यांच्याही खात्यात पैसे लवकरच जमा होतील. कुटुंब चालवताना बहिणींना कसरत करावी लागते. त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. कोणी माईचा लाल आला तरीही, योजना बंद पडणार नाही.

तुमचा भाऊ माहेरचा आहेर वाढवत जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अनेक योजनांच्या माध्यमातून माझ्या बहिणींना लखपती होताना बघायचं आहे. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. हे घेणारे सरकार नसून, हे देणारे सरकार आहे. जे करु शकतो तेच बोलणार आहे. या योजनेत सगळीच यंत्रणा कामाला लागली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे, तुमच्या सावत्र भाऊंना जळजळ, मळमळ होऊ लागली आहे,

बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. फास्टट्रॅकवर ही केस चालणार आहे. संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. चार वर्षाच्या मुलीच्या जीवाशी खेळू नका. हे सरकार त्या आरोपींना फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. या चिमुरडीच्या जिवावर राजकारण करू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हात कलम करण्याचा, छाटून टाकण्याचा इतिहास आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सगळ्या जातीधर्माच्या बहिणींचा समावेश आहे. ही एक दिवसाची ओवाळणी नाही तर, कायमस्वरूपी माहेरचा आहेर आहे. यामध्ये वाढच होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.