स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ३५० वाहनचालकांचा उत्स्फूर्त सहभाग “निरोगी चालक – सुरक्षित प्रवास” ही संकल्पना कार्यक्षेत्रात राबविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि. १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांच्या वतीने वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहापूर येथील जाधव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास इचलकरंजी शहर व परिसरातील वाहनचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास ३५० वाहनचालकांनी सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजीसह विविध आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. वाहन चालविताना चालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

           वाहनचालकांची नियमित आरोग्य तपासणी झाल्यास संभाव्य आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास येऊन त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते. यामुळे ‘निरोगी चालक – सुरक्षित प्रवास’ या संकल्पनेला चालना देणारा हा लोकोपयोगी उपक्रम ठरला.या शिबिरासाठी इचलकरंजी शहरातील विविध आरोग्य संस्था, रुग्णालये तसेच सामाजिक संस्था व संघटनांनी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या संख्येने वाहनचालकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ मिळाला.

वाहनचालकांकडून उपक्रमाचे कौतुक

या उपक्रमाबाबत वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत परिवहन विभागाचे कौतुक केले. एका वाहनचालकाने आपला अनुभव सांगताना म्हटले, “मला चष्मा लागतो, याची मला पूर्वी कल्पनाच नव्हती. या शिबिरात नेत्र तपासणी केल्यानंतर मला ही बाब समजली. त्यानंतर मी तातडीने चष्मा घेतला असून आता अधिक सुरक्षितपणे वाहन चालवू शकतो. या उपक्रमासाठी आरटीओ इचलकरंजीचे मनापासून आभार.”

          उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे वाहनचालक व वाहनधारकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. वाहनचालकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. अशा आरोग्य तपासणी शिबिरांमुळे वाहनचालकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन रस्ते सुरक्षेलाही निश्चितच हातभार लागतो, अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

            ‘निरोगी चालक – सुरक्षित प्रवास’ या संकल्पनेला पुढे नेत परिवहन विभागाच्या वतीने भविष्यातही वाहनचालकांचे आरोग्य आणि रस्ते सुरक्षेसाठी विविध जनजागृतीपर व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील. केवळ दंडात्मक कारवाई न करता समाजप्रबोधनाच्या माध्यमातूनही रस्ते सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आरोग्य संस्था, सामाजिक संस्था, संघटना तसेच सहभागी झालेल्या वाहनचालकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांच्या वतीने आभार मानण्यात आले. विशेषतः समाजसेवक श्री. गजानन शिरगावे यांनी हा लोकोपयोगी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.