गाडी आडवी मारल्याचा राग; धारदार शस्त्राने वार करून वीटभट्टी व्यावसायिकाचा खून!

हरिपूरच्या विकास बोंद्रे यांचा मृत्यू; संशयित पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाकडून आठ दिवसांची पोलीस कोठडी

जयसिंगपूर :सलीम माणगावे 

दि.२५ : रस्त्यावर गाडी आडवी मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना कोथळी (ता. शिरोळ) येथे घडली. चारचाकी वाहनाच्या काचा फोडून धारदार शस्त्राने मानेवर वार केल्याने हरिपूर (ता. मिरज) येथील वीटभट्टी व्यावसायिक विकास बाबुराव बोंद्रे (वय ४७) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयित आरोपी अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय ३६, रा. कोथळी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


          मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सातच्या सुमारास कोथळी गावातील बोरगावे खणीच्या लगतच्या रस्त्यावर ही घटना घडली. विकास बोंद्रे हे मित्र महंमद नायकवडी यांच्यासोबत चारचाकी वाहनातून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून ते हरिपूरकडे परतत असताना कोथळी परिसरात संशयित अभिनंदन पाटील-धडेल हा दुचाकीवरून जात होता. बोंद्रे यांच्या चारचाकी वाहनाने गाडी आडवी मारल्याचा राग मनात धरून संशयिताने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.


बोरगावे खणीजवळ संशयिताने बोंद्रे यांची गाडी अडवली. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होण्यापूर्वीच संशयिताने संतापाच्या भरात चारचाकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने विकास बोंद्रे यांच्या मानेवर वार केला. गंभीर जखमी होऊन बोंद्रे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेनंतर सोबत असलेल्या महंमद नायकवडी यांनी तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. बोंद्रे यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच रात्री आठच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त समजताच हरिपूरसह परिसरात शोककळा पसरली. रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
मृत विकास बोंद्रे यांचा हरिपूर परिसरात वीटभट्टी आणि प्लॉट विकासाचा व्यवसाय होता. त्या हरिपूरच्या माजी सरपंच कविता बोंद्रे यांचे पती, तर ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच संगुदादा बोंद्रे यांचे नातू होत. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. या हल्ल्यामागे केवळ वाहन आडवे मारण्याचा वाद होता की अन्य काही कारणे आहेत, याचा पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

    महिनाभरात दुसरी खुनाची घटना; सीमाभागात भीतीचे सावट!
दरम्यान, महिनाभरापूर्वी दानोळी येथे महेश दळवी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेची चर्चा आणि भीती अद्याप कायम असतानाच कोथळी येथे आणखी एका व्यावसायिकाचा खून झाल्याने सांगली-कोल्हापूर सीमाभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील किरकोळ वादातून थेट जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. व्यसनाधीनता, वाढती हिंसक प्रवृत्ती आणि क्षुल्लक कारणांवरून होणारे प्राणघातक हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.