जांभ्या दगडावरील ३० टक्के रॉयल्टी माफ; चिरेखाण व्यावसायिकांना मोठा दिलासा!

उत्खननानंतर तयार होणाऱ्या खाणींना नैसर्गिक तलावाचा दर्जा देण्यासही मान्यता; आमदार भास्कर जाधव यांच्या मागण्यांना यश

रत्नागिरी: सचिन पाटोळे

दि.२४ : कोकणातील चिरेखाण व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जांभ्या दगडावरील ३० टक्के रॉयल्टी सरसकट माफ करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या गौण खनिज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच उत्खननानंतर तयार होणाऱ्या चिरेखाणींना नैसर्गिक तलावाचा दर्जा देऊन त्यामध्ये पाणीसाठा करण्यासाठी शासनामार्फत ताडपत्री उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे.राज्याच्या गौण खनिज नियमावलीत सुधारणा करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीची तिसरी बैठक महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला समितीचे सदस्य आमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

        कोकणातील चिरेखाण व्यवसायाला भेडसावणाऱ्या अडचणी, जांभ्या दगडावरील रॉयल्टीचा आर्थिक भार आणि उत्खननानंतर निर्माण होणाऱ्या खाणींचा शेतकऱ्यांना होणारा उपयोग या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आमदार भास्कर जाधव यांनी समितीचे लक्ष वेधले होते. जांभ्या दगडावरील ३० टक्के रॉयल्टी माफ करावी, तसेच उत्खननानंतर तयार होणाऱ्या खाणींचा पाणीसाठ्यासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी त्यांनी केली होती.या मागण्यांना समितीने सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही प्रस्तावांना मान्यता दिल्याने कोकणातील चिरेखाण व्यावसायिकांना आर्थिक दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर पावसाचे पाणी साठवण्यासाठी या खाणींचा उपयोग होऊ शकणार असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील स्थानिक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रस्तावांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर कोकणातील चिरेखाण व्यवसाय आणि जलसाठा व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.