सांगली: मयुरी देशपांडे
दि.23: : चोर आल्याची बतावणी करून महिलेचा विश्वास संपादन करायचा आणि हातचलाखीने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करायचे, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील पुण्यातील एका आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. तुषार मनोज वाघिरे (वय ३२, रा. शिवाजीनगर, महात्मा गांधी वसाहत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, अंदाजे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ नोव्हेंबर २०२६ रोजी हा प्रकार घडला होता. शारदा बबन गायकवाड या महिला घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना चोर आल्याची बतावणी केली. परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याचे सांगून अंगावरील सोने घालून एकट्याने फिरू नका, असे म्हणत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ लंपास केली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तपास सुरू केला.
दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील संशयित तुषार वाघिरे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शब्बीर मिस्कीन इराणी आणि जाफर बेग दाबे (दोघेही रा. परळी, जि. बीड) या साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती त्याने दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ हस्तगत केली. या कारवाईमुळे आटपाडीतील महिलेची फसवणूक करून दागिने चोरण्याच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे. अटक आरोपी व हस्तगत मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, उर्वरित आरोपींचा सहभाग आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि त्यांच्या पथकाने केली.