गोमांस विक्री करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करून दुकान सील करा!

हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाची उपायुक्तांकडे मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सांगली: मयुरी देशपांडे 

दि.23  : सांगली महापालिकेच्या मालकीच्या कत्तलखान्यातील गोमांस विक्री करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करून संबंधित दुकान तातडीने सील करावे, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यासह कत्तलखान्याला टाळे ठोकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.सांगली महापालिकेच्या मालकीच्या कत्तलखान्यात सुरज जनार्दन आवळे याचे दुकान असून, तेथे वारंवार गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप हिंदू एकता आंदोलन संघटनेने केला आहे. रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गोमांस विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोमांस पकडून देत संबंधिताविरोधात कारवाईची मागणी केली होती.

       यापूर्वीही सुरज आवळे याच्यावर गोमांस विक्रीप्रकरणी दोन वेळा कारवाई होऊन गुन्हे दाखल झाल्याचा दावा संघटनेने निवेदनात केला आहे. त्यानंतरही पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने संबंधितावर कठोर कारवाई करण्याऐवजी किरकोळ कारवाई केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे संबंधित दुकान आजही सुरू असून गोमांस विक्री होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

वारंवार अशा घटना घडत असल्याने संबंधित दुकानाचा परवाना रद्द करून दुकान सील करावे आणि नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, युवा आघाडी अध्यक्ष दिग्विजय शिंदे, शहराध्यक्ष विकास आवळे, विभागाध्यक्ष गजानन माने, सुजित पाटील, अनिकेत अंबरुळे, शहर उपाध्यक्ष हरपितसिंग गौड, सुमित शिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.