लांजा :नसिर मुजावर
दि.११:उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या गाडीखाली चिरडून झालेल्या मृत्युचे देशभर तीव्र संताप उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज लांजा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश दुकाने दुपार नंतर उघडण्यात आली.
रविवारी संध्याकाळी महाविकास आघाडीकडून बाजारपेठेत रिक्शा फिरवून आपापले व्यवसाय बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु सोमवारी सकाळी दुकाने उघडल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास सांगितली. व्यापाऱ्यांनी त्याला संमिश्र प्रतिसाद दिला व कोरोना काळात दुकाने बंद असल्याने झालेल्या नुकसानातून सावरताना आता पुन्हा बंद नको अश्या प्रतिक्रिया व्यापारी देत होते. बंद पुकारलेला असताना सुद्धा सकाळपासून नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ पहायला मिळत होती. तसेच एसटी व रिक्शा वाहतूक सुरळीत सुरु होते.