रत्नागिरीत गावठी दारूवर पोलिसांची कारवाई; मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

रत्नागिरी: सचिन पाटोळे

दि.३०:रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने व कोकण नगर चौकीच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. ही कारवाई दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बाळासाहेब महाजन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.
सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शिळ मिरजोळे परिसरात पेट्रोलिंग दरम्यान संशयित हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता स्वप्निल सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा व्यक्ती गावठी दारू तयार करताना आढळून आला. यावेळी त्याच्याकडून सुमारे ८,००० रुपये किमतीचा गुळ व नवसागर मिश्रणासह तयार केलेले कच्चे रसायन आणि गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.