पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढणार….

जास्तीत जास्त ऊस गाळपास मिळावा यासाठी निर्णय : चेअरमन पी. एम. पाटील

कबनूर : हबीब शैख 
दि.१५: जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, कार्यक्षेत्रातील ३ साखर कारखान्यांनी आपली दैनंदिन गाळप क्षमता वाढविली आहे. त्यामुळे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास उपलब्ध व्हावा, यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील गावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी दिली.कारखान्याच्या सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन्ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पी. एम. पाटील होते. कारखान्याने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीच्या विषयासह दोन्ही सभांच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी हात उंचावून आवाजी मतदानाने मंजूर केले.
प्रारंभी स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालक रावसाहेब भगाटे यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रद्धांजली चा ठराव मांडण्यात आला. कार्यकारीसंचालक आय. एम. जमादार यांनी दोन्ही वार्षिक सभांच्या नोटिसांचे वाचन केले.यावेळी पी. एम.पाटील यांनी स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जीवनकार्याचा गौरव करीत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. कारखाना स्थापनेपासूनच क्रमपाळीप्रमाणे ऊसतोड करीत असून, सभासदांचा ऊस गाळप झाल्या -शिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मयत सभासदांचे शेअर्स पोटनियमानुसार त्यांच्या वारसांच्या नावे करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ११ सभासदांकडून आलेल्या सूचनांचे वाचन करून त्यांना उत्तरे दिले.
सभेस व्हा. चेअरमन प्रताप उर्फ बाबा शामराव पाटील, सर्व संचालक व संचालिका, माजी संचालक जयपाल कुंभोजे, राजू कागले, दिलीप महाजन, अजित पाटील, शांतगोंडा पाटील, प्रा. आण्णासाहेब क्वाणे, महेश पाटील, महादेव तेली, सौ. विजया पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संचालक विशाल आवटी यांनी आभार मानले.