इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२०: इचलकरंजी शहरात डॉ. राहुल आवाडे विद्यार्थी संघटना आणि २१ नं. क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून खेळाडूंची नोंदणी सुरू आहे, आणि नोंदणीनंतर लिलाव (ऑक्शन) पद्धतीने संघनिहाय निवड केली जाणार असल्याची माहिती सानिका आवाडे व सुहास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेचे आयोजन मार्च महिन्याच्या अखेरीस विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्र. 21 च्या मैदानावर होईल. या स्पर्धेत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून खेळाडूंची नोंदणी होईल आणि त्यांच्यातून 16 संघ बनविले जातील, जे चार गटात विभागले जातील. प्रत्येक गटात 4 संघ असतील. ही स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादीत असेल, त्यामुळे जिल्ह्यातील कोणतीही संघटना किंवा खेळाडू नोंदणी करू शकतात.
नोंदणीसाठी अंतिम तारीख २५ फेब्रुवारी आहे, आणि फॉर्म फी २९९ रुपये आहे. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाईल, आणि दररोज ६ सामने खेळविले जातील. स्पर्धेतील विजेत्या संघास आमदार राहुल आवाडे यांच्या विधानसभा निवडणूकीत मिळविलेल्या मताधिक्याचे बक्षिस म्हणजेच ५६,८११ रुपये दिले जातील. उपविजेत्या संघास २५००० रुपये, आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी१०,००० रुपये बक्षिस दिले जातील. तसेच, प्रत्येक सामन्यात सामनावीर आणि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंच्या वैयक्तिक बक्षिसांची लयलूट केली जाईल.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी २५ फेब्रुवारीपूर्वी नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑक्शनद्वारे संघनिहाय खेळाडूंची निवड केली जाईल.
अधिक माहितीसाठी जावेद सनदी (9112191020), सुहास कांबळे (9096527210), अक्षय बरगे (9689172673) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत अक्षय बरगे, राहुल खामकर, फहिम पाथरवट, नितीन गुलफागे, विनायक आंबिलढोके, राहुल मलके, जावेद सनदी आदी उपस्थित होते.