इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२५ :लिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि शासनदरबारी प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या विकासासाठी ठोस दिशानिर्देश ठरवण्यासाठी लवकरच व्यापक लिंगायत समाज मेळावा आयोजित करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ही बैठक जिजामाता मार्केट, गायत्री भवनजवळ संपन्न झाली. प्रमुख उपस्थिती अशोकराव स्वामी (आण्णा) यांची होती. माजी नगरसेवक प्रकाश पाटील, अॅड. विजय हावळे, बाळासाहेब पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
समाजहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय
या बैठकीत लिंगायत समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये –
✅ जगत ज्योती बसवेश्वरांचा पुतळा लवकरात लवकर उभारणे
✅ लिंगायत समाज रुद्रभूमीचे नूतनीकरण व सुविधा विकास
✅ शासनाच्या सर्व योजनांचा समाजातील सर्व घटकांना लाभ मिळवून देणे
✅ लिंगायत समाजाच्या युवकांसाठी नोकरी व व्यवसाय सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न
✅ लिंगायत समाजातील OBC दाखल्यांसाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा
✅ लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न व अल्पसंख्याक दर्जाची मागणी
संघटन मजबूत करण्याचा निर्धार
मार्गदर्शन करताना अशोकराव स्वामी यांनी स्पष्ट केले की, ही चळवळ कोणत्याही संघटनेच्या विरोधात नाही, तर समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. लिंगायत समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा, शासनाच्या विविध योजनांचा फायदा व्हावा आणि शिक्षण तसेच औद्योगिक क्षेत्रात समाजाने पुढे जावे, यासाठी ही संघटना कार्यरत राहणार आहे.
लिंगायत समाजात ४० हून अधिक जाती आणि ३५० पेक्षा अधिक पोटजाती असल्याने समाज विखुरला गेला आहे. त्यामुळे अनेकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी नव्या संघटनेच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जातील, असे यावेळी ठरवण्यात आले.
लिंगायत समाजाचा भव्य मेळावा लवकरच
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मेळावा आयोजित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. काही मोजक्या व्यक्तींपुरता विकास मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भारत मुरदुंडे, सुनील तोडकर, डॉ. चंद्रकांत लिगाडे, सदा मलाबादे, सुप्रिया मजले, गीता कुरुंदवाडे, सुरेंद्र माळी, रमेश तनवीरे, कलगोंडा पाटील, संजय नागुरे, चिदानंद कोडगी, बाळगोंडा पाटील, गणेश तेलनाडे, शशिकांत पाटील, प्रवीण पाटील, शिवगोंड पाटील, शिवबसू खोत, बाबू पानारी, सुपुत्र चौगुले, सचिन माळी, शशिकांत निजे, नागेंद्र पाटील, अरुण कुंभार, सुनील चिंगळे, शंकर बिल्लूर, सचिन कोरे, सुरेश जमदाडे, किरण स्वामी, उमेश पाटील, राजू तारदाळे, बाळकृष्ण मिठारे, संतोष पाटील, सचिन मडिवाळ यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन
नव्या संघटनेचा उद्देश संपूर्ण लिंगायत समाजाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन या चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.