इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२८ जुलै २०२६ : इचलकरंजीतील रामकृष्ण नगर परिसरातील एका औद्योगिक कंपनीचा अधिकृत ई-मेल आयडी हॅक करून परदेशी कंपनीच्या नावाने बनावट बँक खात्याची माहिती पाठवत तब्बल २०,२२५ अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार ₹१९,३३,२६६.२९,) इतकी रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत राजेंद्रकुमार राठी (वय ३९, रा. रामकृष्ण नगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची “मिरॅकल इंडस्ट्रीज” ही औद्योगिक फर्म असून, तिचे अधिकृत ई-मेल आयडी हॅक करण्यात आले.
दि.२९जून ते१५ जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगाराने कंपनीच्या ई-मेलचा गैरवापर करून अमेरिकेतील व्यावसायिक कंपनीशी संपर्क साधला. संबंधित कंपनीला “कंपनीचे अकाउंट बंद असून नवीन बँक खात्यावर पैसे जमा करावेत,” असा बनावट ई-मेल पाठविण्यात आला. त्यासाठी बनावट बँक खाते व SWIFT कोडची माहिती देण्यात आली.
त्या माहितीवर विश्वास ठेवून परदेशी कंपनीने २०,२२५अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम संबंधित खात्यावर जमा केली. मात्र, मिरॅकल इंडस्ट्रीजकडे पैसे न आल्याने तसेच मालाचा पुरवठा न झाल्याने हा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४ ), ३१९ (२ ) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(C) व ६६66(D) अंतर्गत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१२/२०२६ नोंद करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण (अतिरिक्त कारभार ) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.