कडवई ग्रामपंचायतीवर आगामी काळात शिंदेंसेनेचाच भगवा फडकेल – जिल्हाध्यक्ष राहुल पंडित

संगमेश्वर: दीपक तूळसणकर 

दि.२८ जुलै २०२६  : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिंदेंसेनेचे विभागप्रमुख तथा माजी सरपंच वसंत उजगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बोलताना शिंदेंसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी आगामी कडवई ग्रामपंचायत निवडणुकीत वसंत उजगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंसेनेचा भगवा ग्रामपंचायतीवर फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

          आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडवईमध्ये विविध राजकीय पक्षांकडून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने वसंत उजगावकर यांनी मुंबई–गोवा महामार्गालगत कडवई-तुरळ फाटा येथे नवीन संपर्क कार्यालय सुरू केले आहे.

          या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी वसंत उजगावकर यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. कडवई परिसरात त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क ठेवत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

          यावेळी राहुल पंडित म्हणाले, “आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कडवई ग्रामपंचायतीवर शिंदेंसेनेचा भगवा फडकविण्याचा आमचा निर्धार आहे. वसंत उजगावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि ग्रामस्थांचा विश्वास संपादन करून विजय मिळवतील.”  उद्घाटन सोहळ्यास शिंदेंसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आगामी निवडणुकीची रणनीती, संघटन विस्तार आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.