कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.२५: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची अजिंक्यतारा, कोल्हापूर येथे भेट घेऊन गणपतराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.गोकुळच्या निवडणुकीत सूक्ष्म नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेल्या प्रयत्नांमुळे सभासदांचा विश्वास संपादन करण्यात आला आहे. या यशानंतर दूध उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नव्या नेतृत्वासमोर आहे, असे मत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
गोकुळ हा केवळ दूध संघ नसून लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टांचा, विश्वासाचा आणि सहकाराच्या सामर्थ्याचा ब्रँड आहे. दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा, त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी, तसेच गोकुळची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि लौकिक अधिक उंचावावा, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहे.निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करून दूध उत्पादक, सभासद आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासाला सतेज पाटील सार्थ ठरवतील, असा ठाम विश्वास गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला.
“निवडणुकीतील विजय हा केवळ यशाचा क्षण नसून, जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाला कृतीतून उत्तर देण्याची जबाबदारी असते. गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची संधी मिळावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी शिरोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दरगू गावडे, दत्तचे संचालक शेखर पाटील, वीरशैव बँकेचे संचालक वरुण पाटील, अशोक कोळेकर, जयसिंगपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम, नगरसेवक संजय पाटील, गुंडाप्पा पवार, सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव, नितीन बागे, उदय पाटील, जयदीप थोरात, वसीम जामदार, स्वप्नील कांबळे आणि ओंकार मुडशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.