इचलकरंजी :विजय मकोटे
दि ७ मे – डिकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक (वायसीपी) या नामवंत शिक्षणसंस्थेला अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (AICTE, दिल्ली) नव्याने दोन पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे – डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड मशीन लर्निंग (AI-ML) आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स. हे अभ्यासक्रम २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहेत, आणि त्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी थेट प्रवेश घेऊ शकतात.
या अभ्यासक्रमांची विद्यार्थी क्षमता ६० असून, प्रवेश प्रक्रिया शासकीय CAP राऊंडद्वारे होणार आहे. संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, “डिजिटल युगात एआय व मेकॅट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज आहे. पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीमुळेच या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली असून, स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.”
वायसीपीमध्ये या कोर्सेससाठी तज्ज्ञ प्राध्यापक, अॅडव्हान्सड रिसर्च लॅब्स, अत्याधुनिक सॉफ्टवेअर व लॅब्स उपलब्ध आहेत. संस्थेच्या इतर अभ्यासक्रमांना एनबीए मान्यता असून, येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. १००% प्लेसमेंट आणि उज्ज्वल निकाल ही वायसीपीची ओळख आहे.
एआयएमएल कोर्समधून विद्यार्थी मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डीप लर्निंग, NLP, IoT यांसारख्या प्रगत क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतात. तर मेकॅट्रॉनिक्समुळे यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि संगणक यंत्रणांच्या संगमातून नव्या प्रकारच्या उद्योग व संशोधन क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो.
या यशस्वी उपक्रमासाठी डिकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डॉ. एल.एस. अडमुठे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शैक्षणिक भविष्यासाठी नवीन वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे!