तारदाळच्या वीरपत्नी प्रियांका खोत भारतीय सैन्यात लेफ्टनंट

तारदाळ (ता. हातकणंगले) –राम आवळे
        तारदाळ गावातील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे संपूर्ण तारदाळ गावाचा गौरव वाढला आहे.

शहीद जवान निलेश खोत हे सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. २०२२ मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. या कठीण प्रसंगानंतर खचून न जाता प्रियांका खोत यांनी पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. कठोर अभ्यास, शारीरिक प्रशिक्षण आणि अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. नुकत्याच झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली.गावात परतल्यानंतर लेफ्टनंट प्रियांका खोत यांनी प्रथम ग्रामदैवत श्री शिरकाई मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी प्रियांका खोत म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.”

या मिरवणुकीत गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.