इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 

दि .९: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
यावर्षीचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, शाळा क्र. २७ च्या शिक्षिका सौ. मनीषा सुधीर डिग्रजे आणि माई बाल विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ. लता बाळासो नाईक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट पटनोंदणीचा पुरस्कार रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ या शाळेला देण्यात आला, तसेच डॉक्टरेट मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका अलका शेलार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी भूषवले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात विचारवंत आणि साहित्यिक सुनीलकुमार लवटे उपस्थित होते. याप्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, विद्या कदम, सहायक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांच्या प्रास्ताविकाने झाली. शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपायुक्त अशोक कुंभार यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्व शिक्षकांबद्दल समाधान व्यक्त केले. आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व शिक्षकांना ज्ञानाच्या कामांमध्ये अधिक प्रभावीपणा आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यात महापालिकेच्या शाळांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रमुख मार्गदर्शक सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर शिकण्याची संधी निर्माण करून देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित शेट्टी आणि शीतल कुंभार यांनी केले, तर पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.