कोल्हापूर :रेणू पोवार
दि .१५ : साखर उद्योगाच्या शाश्वत, हरित आणि उत्पादनक्षम भविष्यासाठी दिशा ठरविणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आले. भारतीय शुगर, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत देशभरातील साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि मशिनरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी बोलताना त्यांनी साखर उद्योगासमोरील विविध आव्हानांवर प्रकाश टाकत उपपदार्थ निर्मिती, उत्पादन खर्चात बचत, व नव्या तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देण्याचे आवाहन केले.
“पूर्वी साखर हेच एकमेव उत्पन्नाचे साधन होते. मात्र आता उद्योगांनी इथेनॉल, CBG, बायोमास आदी उपपदार्थांच्या माध्यमातून मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून सीमित क्षेत्रात अधिक ऊस उत्पादन घ्यावे लागेल,” असे ते म्हणाले.
कार्यशाळेत नव्याने नियुक्त झालेल्या कार्यकारी संचालक व सीईओंचा सत्कारही प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
तांत्रिक सत्रांमध्ये विविध विषयांवर सादरीकरण
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रांमध्ये देशभरातील तज्ज्ञांनी सीबीजी निर्मिती, झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD), ड्युअल फीड स्टॉकवर आधारित इथेनॉल उत्पादन, वाफ व ऊर्जा संवर्धन, ग्राहकाभिमुख साखर उत्पादन, उपपदार्थांचे प्रमाण वाढविण्याच्या संधी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. काही कंपन्यांनी नवीन यंत्रसामग्री व उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर केले.
प्रश्नोत्तर सत्रात कारखान्यांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी व त्यावरील उपायांवर मोकळ्या चर्चेच्या माध्यमातून समाधान शोधले गेले.
शाश्वततेसाठी तंत्रज्ञान आणि धोरणांची गरज
कार्यशाळेतील चर्चांमधून साखर उद्योगासाठी खालील मुख्य मुद्दे पुढे आले:
-
तांत्रिक नवोपक्रम व आधुनिक यंत्रसामग्रीचा स्वीकार
-
उत्पादन खर्चात कपात
-
ऊस शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण
-
सरकारकडून दीर्घकालीन व स्पष्ट धोरणांची आवश्यकता
भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सीईओ संग्रामसिंह शिंदे, तसेच समिती सदस्य व साखर क्षेत्रातील अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
उद्योग आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दिशा
या कार्यशाळेमुळे साखर उद्योगास विकासाच्या नव्या वाटा उपलब्ध होतील, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार सुलभ होईल व शाश्वततेकडे वाटचाल होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.