शिरोळ : कयुम शेख
दि.३० जुलै २०२६ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अकीवाट येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस उत्पादन वाढविण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दत्त कारखान्याच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्यास प्रतिएकर १०० ते १५० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात बोलताना जगताप यांनी ऊस लागवडीपासून काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे शास्त्रीय नियोजन शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. योग्य अंतरावर सऱ्या काढणे, हुमणी किडीचे प्रभावी नियंत्रण, जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन, एक डोळा व दोन डोळा लागवड पद्धतीचे फायदे, पाणी व्यवस्थापन, औषध फवारणीचे योग्य वेळापत्रक, पिकाच्या वाढीनुसार पानांचा रंग व जाडी यावरून पिकाची स्थिती ओळखणे तसेच फुटवा झाल्यानंतर बाळभरणीचे नियोजन याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.दर्जेदार व रोगमुक्त बेण्याची निवड, वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब आणि संतुलित खत व्यवस्थापन यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महावीर शिरगावे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्य शेती अधिकारी हेगान्ना यांनी आधुनिक ऊस शेतीतील विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. महाधन कंपनीचे योगेश महसे यांनी संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले.यावेळी गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी पंचसूत्री शेतीचा अवलंब करून सुपर केन नर्सरीचा वापर करण्याचे आवाहन केले. दत्त कारखाना हा शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब बडबडे होते.
यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक इंद्रजित पाटील, प्रमोद पाटील, संजय पाटील, ज्योतीकुमार पाटील, भैयासाहेब पाटील, बाळासाहेब हलसवडे, महेंद्र बागे, सिदगोंडा पाटील, विजय सूर्यवंशी, रावसाहेब नाईक, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. देसाई, सज्जनसिंग राजपूत, मोहन ढवळे, ताजुद्दीन तहसीलदार, राजगोंडा पाटील (शिरगावे), भरत रायनाडे, भरमू रायनाडे, लालू आवटी, बाबासो नाईक, कुमार मिठारी, राजू आवटी, कुमार तवंदकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.