इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.१२ : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा सोलगे मळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते ई-बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आधुनिक, सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वाला यामुळे इचलकरंजीत प्रारंभ झाला आहे.लोकार्पण सोहळ्यास महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, विरोधी पक्षनेते उदय पाटील, परिवहन समिती सभापती सतीश मुळीक, महिला व बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, समाजकल्याण सभापती रुबन आवळे, परिवहन उपायुक्त नंदु परळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी, नगरसेवक तानाजी पोवार, रविंद्र माने, रवी रजपुते, रणजीत जाधव, संतोष शेळके, राजू बोंद्रे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर, सारिका पाटील, नंदकुमार पाटील, उपसभापती पूनम माळी, नगरसेवक ओंकार सुर्वे, योगेश पाटील, नितेश पोवार, सचिन राणे, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट, नगरसेविका धृवती दळवाई, सरिता आवळे, तेजश्री भोसले, किरण खवरे, मनिषा नवनाळे, स्वाती लोखंडे, रुपा बुगड, विजया महाजन, स्नेहल रावळ, सपना भिसे, वैशाली मोहिते यांच्यासह प्रमोद बचाटे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, दिलीप मुथा उपस्थित होते.
महानगरपालिका प्रशासनातील उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, सहायक आयुक्त सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शहर अभियंता बाजीराव कांबळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना
पीएम ई-बस सेवेमुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. इलेक्ट्रिक बसमुळे पारंपरिक इंधनाचा वापर कमी होण्यासोबतच वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकार्पण सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी ई-बसची पाहणी करून बसमधील आधुनिक सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ई-बसला हिरवा झेंडा दाखवून सेवेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
शहराच्या प्रमुख मार्गांवर ई-बसचा ताफा
लोकार्पणानंतर ई-बसचा ताफा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाला. एकाचवेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून धावणाऱ्या आधुनिक ई-बस पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर नागरिकांनी ई-बसचे उत्साहात स्वागत केले. शहराच्या रस्त्यांवर ई-बसचा ताफा धावताना दिसताच नागरिकांमध्ये नव्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
३० सप्टेंबरपर्यंत मोफत प्रवास
ई-बस सेवेच्या शुभारंभानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेने शहरवासीयांना विशेष सुविधा दिली आहे. दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पीएम ई-बस सेवेतून नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. नव्याने सुरू झालेल्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नागरिकांना ओळख व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे.
शहराच्या विकासाला नवी दिशा
खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरासाठी सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचे सांगितले. पीएम ई-बस सेवेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळून शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी ई-बस सेवा ही इचलकरंजीच्या आधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले. नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास या सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी पीएम ई-बस सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीएम ई-बस सेवेच्या शुभारंभामुळे इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. स्वच्छ, हरित, आधुनिक आणि शाश्वत शहराच्या दिशेने इचलकरंजीने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, आगामी काळात ई-बस सेवा शहरवासीयांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार बनण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.