सुरक्षित व सुरळीत गणेशोत्सवासाठी लोटे एम.आय.डी.सी.मध्ये पोलिसांचा आढावा

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा उद्योग व वाहतूक संघटनांशी संवाद

लोटे,: सचिन पाटोळे 

दि. १२ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योग, वाहतूक व्यवस्था तसेच कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उद्योग भवन, लोटे एम.आय.डी.सी., खेड येथे विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी उद्योग व वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून विविध समस्यांचा आढावा घेतला.गणेशोत्सवाच्या काळात लोटे एम.आय.डी.सी. परिसरात वाढणारी वाहतूक, कामगारांची सुरक्षितता, वाहतूक कोंडी तसेच आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर आवश्यक उपाययोजना, पोलीस बंदोबस्त आणि परस्पर समन्वयाबाबत पोलीस अधीक्षक बगाटे यांनी मार्गदर्शन केले.


या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग श्री. होलेकर दणस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन देवे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे, लोटे पोलीस दूरक्षेत्र प्रभारी स.पो.नि. श्री. बेलदार, खेड व चिपळूण येथील वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योग भवनचे अध्यक्ष श्री. राज आंब्रे तसेच लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढणारी वर्दळ लक्षात घेता वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात आला. वाहतूक कोंडी टाळणे, चाकरमान्यांचा व गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
दरम्यान, गणेशोत्सव-२०२६ कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर लागू असलेल्या निर्बंधांची माहिती वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक संघटनांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी केले. बैठकिच्या माध्यमातून उद्योग, वाहतूक संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून गणेशोत्सव काळात सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.