इचलकरंजी ;सलीम माणगावे 
दि .१५ : हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे ऊसासह इतर पिकांवर तांबेरा, लोकरी मावापानांवरील ठिपक्यांच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांच्या ऊस पिकांवर ड्रोनद्वारे औषध फवारणी मोफत/माफक दरात करण्यात येत आहे.मे २०२५ पासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाशाचा अभाव जाणवतो आहे. त्यामुळे ऊस पिकाची वाढ संथ झाली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी व कारखान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

           कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे व ज्येष्ठ संचालक प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी 2024-25 गळीत हंगामापासून ड्रोनद्वारे द्रवरूप खते व औषध फवारणी योजना सुरु करण्यात आली आहे. ही सेवा माफक दरात आणि बिनव्याजी क्रेडिटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी आवश्यक बुरशीनाशके व कीटकनाशकांची उपलब्धता करून ड्रोनद्वारे फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पीक संरक्षित राहून उत्पादनात घट होण्यापासून बचाव होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

        गाळपासाठी ऊस नोंद केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील शेती सर्कल, गट कार्यालय किंवा शेती स्टाफशी त्वरित संपर्क साधावा व या फवारणी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.