इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१५ : सिद्धरेखा फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसेच अशोकराव माने बीएड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. श्वेता सचिन चौगुले यांनी शनिवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कोल्हापूरातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. डॉ. चौगुले यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची शिक्षक आघाडी अधिक बळकट होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे , माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजप कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव उपस्थित होते. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावनी करून भाजपने खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती केली आहे. भाजपचा हा शैक्षणिक विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही डॉ. श्वेता चौगुले यांनी यावेळी दिली. इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले तालुक्यात सिद्धरेखा फौंडेशनच्या माध्यमातून डॉ. चौगुले यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबीर, गरजूना मदत, महिलांसाठी मार्गदर्शन शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ. चौगुले यांनी या परिसरात वेगळा ठसा उमटवला आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणावरही त्या सातत्याने लढा देत आहेत. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या सहकार्याने डॉ. चौगुले पर्यावरण चळवळीत राज्यभर कार्यरत आहेत. त्यासाठी अनेक लढे त्या लढल्या आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून डॉ. चौगुले यांनी राज्यभरातील गरजवंताना न्याय मिळवून दिला आहे. गेल्या १८ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात त्या कार्यरत असून राज्यभरातील विविध संघटनामध्ये त्या सक्रिय आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांचे संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. शैक्षणिक विषयावर त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध असून सामाजिक, शैक्षणिक विषयावर त्यांचे अनेक लेख नामांकित दैनिकांत प्रसिद्ध झाले आहेत. स्पर्धा परीक्षा, टीईटी, सेट -नेटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. चौगुले यांनी ५०० हून अधिक सेमिनारमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या याच शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला अधिक ताकद मिळाल्याचे मानले जात आहे