डॉ. श्वेता चौगुले यांचा भाजपमध्ये प्रवेश: शिक्षक आघाडीस नवे बळ

इचलकरंजी: सलीम माणगावे 

दि .१६;सिद्धरेखा फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि अशोकराव माने बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. श्वेता सचिन चौगुले यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे. कोल्हापूरमधील भाजपच्या जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

या वेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव यांचीही उपस्थिती होती. डॉ. चौगुले यांच्या प्रवेशामुळे भाजपची शिक्षक आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.

शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य

डॉ. श्वेता चौगुले गेली 18 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी राज्यभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. सिद्धरेखा फौंडेशनच्या माध्यमातून इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले तालुक्यात आरोग्य शिबिरे, महिला मार्गदर्शन शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध मदतीचे उपक्रम राबवले गेले आहेत.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाविरोधात त्यांनी सातत्याने लढा दिला असून जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या सहकार्याने त्या राज्यभर पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत.

राज्यभरात सामाजिक न्यायासाठी कार्यरत

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील गरजूंना न्याय मिळवून देण्यात डॉ. चौगुले यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आतापर्यंत शैक्षणिक विषयावर दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. स्पर्धा परीक्षा, टीईटी, सेट-नेट परीक्षांसाठी त्यांनी ५०० हून अधिक सेमिनार्समध्ये मार्गदर्शन केले आहे.

भाजपच्या शैक्षणिक विचारसरणीत विश्वास

भाजपच्या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडवून आणली असून, हा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही डॉ. चौगुले यांनी दिली.

पक्षासाठी नवी ऊर्जा

त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय योगदानाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. डॉ. चौगुले यांच्या प्रवेशामुळे भाजपला नवीन ऊर्जा आणि व्यापक सामाजिक आधार मिळणार असल्याचे मानले जात आहे.