सांगली: अय्यन पटेल
दि. २० : सांगली जिल्ह्यातील तीन दिवसीय फळ महोत्सवात तब्बल ९ लाख १२ हजार रूपयांची उलाढाल झाली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने यांनी दिली.महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर आणि सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचा उद्देश शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फळांवर प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन देणे, असे कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने, प्रतीक गेनुगडे, अनिल जाधव, सुयोग टकले, संदेश पिसे आणि सुशांत खाडे उपस्थित होते.
फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील पिवळे/गुलाबी ड्रॅगनफ्रुट, विटा व वाळवा तालुक्यातील पेरू, चिकू, केळी, तसेच आटपाडीचे अंजीर, डाळींब, सीताफळ व इतर विविध फळांची विक्री शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली. या महोत्सवात एकूण 22 फळ उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
विशेष आकर्षण ठरलेले होते जत तालुक्यातील ड्रॅगनफ्रुटवरून तयार केलेले ड्रॅगनफ्रुट आईस्क्रीम, जे पहिल्यांदाच सांगली शहरवासीयांना चाखायला मिळाले. तसेच मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत व्यंकटेश ॲग्रो यांनी तयार केलेली जांभूळ, लिंबू, पपई आणि स्ट्रॉबेरी पासूनची उत्पादने देखील विक्रीसाठी उपलब्ध होती.
महत्वाचे म्हणजे, महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पन्नन विभागाचे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आभार मानले व पुढील वर्षीही अशाच महोत्सवांचे आयोजन करण्याची विनंती केली.