कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२१ : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप वाटेगांवकर आणि संशोधक विद्यार्थिनी अपर्णा तोडकर यांनी विकसित केलेल्या ऊर्जा साठवणूक करणाऱ्या कॅडमियम सल्फाइड नॅनोपदार्थ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण पद्धतीला जर्मन सरकारचे पेटंट मिळाले आहे.
या यशामुळे महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मजबूत केले असून, किसन वीर महाविद्यालय वाईचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. याआधी डॉ.झांबरे व डॉ.वाटेगावकर यांच्या संशोधनाला ब्रिटिश सरकारचे पेटंट मिळाले होते, तसेच अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेच्या सर्वेक्षणात त्यांना जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान प्राप्त झाले आहे.
डॉ.झांबरे म्हणाले, “सध्याच्या जागतिक परिस्थितीत कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा साठवणूक उपायांची निर्मिती ही गरज आहे. आमच्या टीमने ऊर्जा साठवणुकीसाठी उपयुक्त नॅनोपदार्थ तयार करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. या नॅनोपदार्थाचा उपयोग सुपरकॅपॅसिटर आणि बॅटरीसारख्या विद्युत उपकरणांमध्ये अत्यंत कार्यक्षम ठरतो.”
डॉ.वाटेगावकर यांनी सांगितले, “वाढती लोकसंख्या आणि उर्जेवरचा ताण लक्षात घेतल्यास, हे संशोधन ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन दिशादर्शक ठरू शकते. नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा साठवण्याचे नविन उपाय विकसित करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे पाऊल ठरेल.”
संशोधक विद्यार्थिनी अपर्णा तोडकर म्हणाली, “या संशोधनात सहभागी होणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मिळालेले पेटंट आमच्या टीमच्या मेहनतीचे फळ असून, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, “रसायनशास्त्राच्या टीमने विकसित केलेली संश्लेषण पद्धत सोपी, कमी खर्चिक असून नवोदित संशोधकांसाठी आणि कमी उपकरण असलेल्या प्रयोगशाळांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचा शैक्षणिक व औद्योगिक संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो.”
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार श्री. नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.