गोकुळ दूध संघाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी; शालेय व जीवनावश्यक साहित्याचे १,००० पॅकेटस् वितरित

कोल्हापूर: रेणू पोवार 

दि. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमातून जमा झालेल्या निधीचा वापर शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी करण्यात आला.या योगदानातून साखर, तेल, रवा, पिठ्ठी, डाळी, साबण, ब्लँकेट, रजई यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह वही, पेन, शालेय पिशव्या आदी साहित्यांची १,००० पॅकेटस् तयार करण्यात आली. ही मदत सामग्री महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मा. नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आली. या वेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळाचे सदस्य, आयटकचे पदाधिकारी व गोकुळचे कर्मचारी उपस्थित होते.

मा. हसन मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी दिलेला पगार व त्यातून केलेली ही मदत अत्यंत कौतुकास्पद आहे. संकटाच्या काळात दिलेला गोकुळ परिवाराचा हा हात सामाजिक जबाबदारीची आणि संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा आहे.”

संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. सदाशिव निकम म्हणाले, “गोकुळचे कर्मचारी सामाजिक बांधिलकीसाठी नेहमीच पुढे असतात. आयटक पुरस्कृत कर्मचारी संघटनेतून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. लातूर भूकंप, केरळ पूरस्थिती, कोरोना काळ तसेच विविध संकटांमध्ये गोकुळने नेहमी समाजासाठी योगदान दिले आहे.”

मराठवाड्यातील पूरस्थितीत गोकुळ दूध संघाने केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच नव्हे, तर पशुखाद्य व ३,२०० लिटर मोफत दूध पुरवठ्याची मदतही केली आहे. यामुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळाला.

या प्रसंगी मा. मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार व केडीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, तसेच आयटकचे राज्य व जिल्हा पदाधिकारी कॉ. दिलीप पोवार, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. मल्हार पाटील, कॉ. व्ही.डी. पाटील, कॉ. संभाजी शेलार, कॉ. योगेश चौगुले, कॉ. कृष्णा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.