इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.१४ – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. मंगळवारी इचलकरंजीतील दोन माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सचिव तसेच अनेक माजी नगरसेवक-नगरसेविकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.मुंबईतील भाजपा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलही उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, रवी रजपुते, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे, माजी नगरसेविका शुभांगी माळी, दीपाली हुक्किरे, तसेच माजी नगरसेवक तानाजी हराळे, श्रीकांत कांबळे, राजू खोत यांच्यासह प्रधान माळी, सचिन हुक्किरे, रवी कांबळे, शहाजान मुजावर, विष्णु नाकिल आदींनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा प्रवेश केला.या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून स्वागत करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, “आगामी महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असून पहिला महापौर आपलाच असेल,” असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले की, “इचलकरंजीत विविध राजकीय पक्षांतील अनेक नेते, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते भाजपाशी संपर्कात आहेत. आगामी काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहे.”या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष बलवान, रफिक खानापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांसाठी मोठा धक्का ठरत असून, प्रभावी नेतृत्व आणि अनुभव संपन्न नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाची स्थानिक पातळीवरील ताकद आणखीन बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.