जागतिक आर्किटेक्चर दिन साजरा : ग्रीन बिल्डिंगद्वारे प्रदूषणमुक्त समाजाची हाक — आर्किटेक्ट प्रमोद ‘ग्रीन बाबा’ चौगुले

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि.२५: असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट, इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक आर्किटेक्चर दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी “ग्रीन बिल्डिंग अ‍ॅण्ड कम्युनिटीज” या विषयावर प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद ‘ग्रीन बाबा’ चौगुले यांनी मार्गदर्शन केले.श्री. चौगुले म्हणाले, “पाणी, हवा, सूर्य, जमीन आणि अवकाश या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या वसुंधरेस मानवाच्या बेफिकिरीमुळे ‘घरघर’ लागली आहे. जर आपणच ती थांबवली नाही, तर मानवजातीचा अंत निश्चित आहे.” त्यांनी सांगितले की, वास्तू निर्माण प्रक्रियेतून जगभरात सुमारे ३८  टक्क्यांपर्यंतचे प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंगची गरज अत्यंत महत्त्वाची ठरते.“वास्तू उभारणी करताना नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर, नद्या व परिसर स्वच्छ ठेवणे, आणि पर्यावरणाशी सुसंगत बांधकाम करणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खंडेराजुरी यांनी केले.जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा यांचा ग्रीन बाबा प्रमोद चौगुले यांच्या हस्ते शाल, फेटा व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच श्री. चौगुले यांचा अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय तांत्रिक हेड शितलराज सिंदखेडे आणि टेरीटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.सुरेख नियोजनाबद्दल अल्ट्राटेक सिमेंट डीलर नितीन धूत व घनश्याम सावलानी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शितलराज सिंदखेडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटच्या टेक्निकल प्रॉडक्ट्स आणि ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमास असोशिएशनचे सेक्रेटरी विकास नाईक, जॉइंट सेक्रेटरी भरत केटकाळे, ट्रेझरर नितीन शेट्टी, तसेच विवेक सावंत, रवींद्र तोरस्कर, गिरीश मोकाशी, सुहास रुग्गे, प्रकाश मालवीय, अल्ट्राटेक सिमेंटचे हर्षल धूत, रोहित सावलानी, विभागीय तांत्रिक प्रबंधक सागर छांगाणी, चॅनेल रिलेशनशिप मॅनेजर कल्पक मेहता यांच्यासह २०० हून अधिक सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार नितीन धूत यांनी मानले.