कडवई:-
देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा कुमार साईराज उमेश आंब्रे याला १९ वर्षाखालील गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.
साईराजने अण्णासाहेब डांगे क्रीडा संकुल, आष्टा (तालुका: वाळवा, जिल्हा: सांगली) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. साईराज सध्या कनिष्ठ महाविद्यालयात १२वी बँकिंग या वर्गात शिकत असून त्याला व्हॉलीबॉलबरोबरच मैदानी खेळातही विशेष आवड आहे.
यावर्षी त्याने उंच उडी प्रकारातील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठीही निवड प्राप्त केली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, क्रीडा शिक्षक तानाजी कदम व सागर पवार यांचा त्याला सतत मार्गदर्शन लाभत आहे.
साईराजच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संसाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. धनंजय दळवी व अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.