संगमेश्वर : दीपक तूळसणकर
दि.२३: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या स्पर्धेत मौजे कडवई ग्रामपंचायतीने उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला असून, अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज भेट दिली.यावेळी त्यांच्या सोबत मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. सागर पाटील, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. विजयसिंह जाधव, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. अनिरुद्ध आठले, मा. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. मल्लिनाथ कांबळे हे अधिकारी उपस्थित होते.
कडवई ग्रामपंचायत हॉल येथे ग्रामपंचायत अधिकारी श्री. राहूलकुमार चौधरी यांनी अभियानाबाबत सविस्तर आढावा सादर केला. पाहणी पथकाने ग्रामविकास, आरोग्य, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, बांधकाम अशा विविध विभागांच्या कामांची माहिती घेतली व प्रशासकीय बाबींचा सखोल आढावा घेतला. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करून अभियानासाठी आवश्यक विविध सूचनाही दिल्या.
कार्यक्रमास मा. गटविकास अधिकारी श्री. आनंद लोकरे, सहायक गटविकास अधिकारी श्री. विनोदकुमार शिंदे, मा. विस्तार अधिकारी श्री. घुले रावसाहेब, श्री. पारसे, श्री. निकम, कृषी अधिकारी श्री. परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी श्री. प्रणय भायनाक, पाणीपुरवठा विभागाचे उपभियंता श्री. कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिरीषकुमार गायकवाड तसेच मा. सरपंच सौ. विशाखा कुवळेकर, उपसरपंच श्री. दत्ताराम ओकटे आणि ग्रामपंचायतीचे अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांबाबत पाहणी पथकाने समाधान व्यक्त केले असून अभियानाच्या पुढील टप्प्यात अधिक गुणवत्तापूर्ण कामांची अपेक्षा व्यक्त केली.