कबनूर: हबीब शेखदर्जी
दि २६ : कबनूर ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हापूर रोडवरील फुलेनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून फुटलेल्या गटार पाइपच्या दुरुस्तीचे काम रखडले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी रस्त्याच्या सुरुवातीस बसविण्यात आलेले एक फूट व्यासाचे व सुमारे सहा फूट लांबीचे सिमेंट पाइप सहा महिन्यांपूर्वीच पुटले आहेत. यामुळे गटारीतील पाणी रस्त्यावर सांडत असून रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
नागरिकांनी या संदर्भात अनेकवेळा कबनूर ग्रामपंचायत प्रशासनाकडे तसेच स्थानिक सदस्यांकडे नवीन पाइप बसविण्याची मागणी केली. मात्र, संबंधित सदस्यांनी ‘करूया’ अशी केवळ तोंडी आश्वासने देत वेळ घालविल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामसेवक अधिकाऱ्यांनीही मुकादम यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या असूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
स्थितीची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी स्वतः सरपंचांना जागेवर बोलावून समस्या दाखवली होती. सरपंचांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठवडा उलटूनही काम सुरू झालेले नाही. फुटलेल्या पाइपमधून बाहेर आलेल्या लोखंडी तारा लहान मुले, वृद्ध व पादचारी यांच्यासाठी धोकादायक ठरत आहेत.कबनूर ग्रामपंचायतीच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, तातडीने काम न झाल्यास हे प्रकरण आमदारांकडे नेण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.